लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यात एकीकडे तीव्र दुष्काळामुळे चारा- पाणी टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे बेभाव विकली आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची विक्री करु नये, यासाठी काजळा येथील एका गोसेवकाने गौशाळेला दुष्काळात स्वखर्चातून ५० गायींच्या चारा- पाण्याची व्यवस्था करून एक आदर्श निर्माण केला आहे़गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी नसल्याने शेतक-यांनी फळबागा तोडून टाकल्या. त्याचबरोबर चाराटंचाईमुळे अनेक शेतक-यांनी जनावरांची बेभाव विक्री केली.काजळा येथे संत रघुनाथ बाबा महाराज यांनी गोशाळा सुरू केली होती. मात्र, काही वर्षापूर्वी संत रघुनाथ बाबा महाराज यांचे देहावसान झाल्यानंतर या गोशाळेतील गायींकडे आर्थिक मदतीअभावी दुर्लक्ष होऊ लागले़ या गोशाळेतील गायींना चारा- पाण्यासह सोयी- सुविधा पुरविण्याबाबत बदनापूर येथील आर पी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भरत भांदरगे यांना याबाबत समजले. त्यांनी काजळा येथील या गोशाळेत जाऊन तेथील गोशाळेची पाहणी केली.यावेळी तेथे अनेक सुविधांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले़ मूळचे शेतकरी कुटुंबातील असलेल्या भरत भांदरगे यांनी तात्काळ या गोशाळेचा विकास करून गायींसाठी चारा- पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला़ त्यांनी गायींना तात्काळ स्वखर्चातून ६० बाय ३० फुटाचे दोन मोठे शेड, गायींना चारा टाकण्यासाठी गव्हाणी तयार केल्या. तसेच गायींचा चारा व खाद्य बारीक करण्यासाठी कुट्टीमशीन खरेदी करून दिली.पिण्याच्या पाण्यासाठी एक हौद तयार केला़तसेच या भागात दुष्काळामुळे चारा टंचाई निर्माण झाल्यामुळे मुक्ताई नगरहून दहा टन मकाग्रास गायींसाठी उपलब्ध करून दिले़गायींना या भागात हिरवा चारा मिळत नसल्यामुळे १ मे २०१९ पासून नियमित जालना येथून दोन हजार रूपयांचा घास (हिरवा) चारा स्वखर्चाने विकत घेऊन पुरविला जात आहे.
दुष्काळात गोशाळेला स्वखर्चाने दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:25 AM