संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जालना जिल्ह्याला सहा हजार शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु त्यापेक्षा जास्त कामे जिल्ह्यात झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. यामुळे सिंचन क्षमतावाढीसह शाश्वत उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. असे असले तरी यंदा कमी पाऊस पडल्याने या शेततळ्यात जेमतेम पाणीसाठा आहे.मागेल त्याला शेततळे बांधण्यासाठी शासनाकडून ५० हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात यंदा सहा हजार शेततळी व्हावित असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. परंतु अर्जांची संख्या जास्त आल्याने त्यांना ही कामे करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील शेततळ्यांचे जवळपास एक हजार शेततळ्याचे अनुदान लेखा परीक्षकांच्या आक्षेपामुळे थकले आहे. हे अनुदानही लवकरच वितरित करण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्हा सिंचनाच्या अनुशेषाबाबत अद्यापही कोसो दूर आहेत, त्यामुळे शेततळे, आहे ते पाणी ठिबक सिंचनाव्दारे देणे इ. कामांना प्राधान्य दिले जात आहे.केंद्र आणि राज्य सरकारकडून सूक्ष्मसिंचन अर्थात ठिबक सिंचनासाठी देखील भरीव अनुदान दिले जात असल्याने ठिबक संच बसविण्यावर शेतक-यांचा भर आहे. यामुळे अधिकाधिक शेती सिंचनाखाली येणार आहे.दहा कोटी अनुदान प्राप्तठिबक सिंचनाचे केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. त्यात केंद्र सरकारचे सहा कोटी रूपये मिळाले होते, पैकी चार कोटी रूपयांचे अनुदान संबंधित पात्र शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. तर राज्य सरकारचे चार कोटी रूपयांचे अनुदान दिवाळीनंतर मिळाले होते. त्यापैकी जवळपास अडीच कोटी रूपये शेतक-यां देण्यात आले आहेत.- विजय माईनकर,कृषी अधीक्षक जालना
शेततळ्यांचे उद्दिष्ट ‘ओव्हरफ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:52 AM