घनसावंगी (जालना ) : तालुक्यातील पिंपरखेड बु येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उस हुमनी अळीने पोखरला आहे. उसाचे संगोपन करुनही हाती काही लागण्याची शक्यता नसल्याने दहिफळे यांनी आज सकाळी मोफत उस तोडून नेण्याचे नागरिकांना आवाहन केले.
जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून परिसरात सिंचनासाठी पाणी मिळत असल्याने अंबड आणि घनसावंगी तालुक्यात हजारो हेक्टरवर उसाची लागवड केली आहे. उस चांगला बहरात असतांना हुमनी अळीने उस पोखरल्याने पीक पिवळे पडण्यास यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यातील पिंपरखेड बु येथील शेतकरी दतात्रय विठ्ठलराव दहिफळे यांच्या तीन एकरातील उससुद्धा हुमनी अळीने पोखरला. यामुळे निराश झालेल्या दहिफळे यांनी उस तोडण्याचा निर्णय घेतला. तसेच नागरिकांना मोफत उस तोडून नेण्याचे आवाहन केले. यानंतर उस तोडण्यासाठी नागरिकांनी शेतात गर्दी करत काही वेळातच तीन एकरातील उस आडवा केला.