- अशोक डोरलेअंबड : तालुक्यातील गोंदी या गावातील शेतकरी कुटुंबातील रोहिणी तुळशीदास सोळुंके यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2022 मध्ये 'शाळा निरीक्षक प्रमाणित आणि संस्था'(राजपत्रित वर्ग 2 अधिकारी) या पदी निवड झाली आहे. रोहिणी यांच्या यशाने त्यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
रोहिणी यांचे शालेय शिक्षण गोंदी येथे जिल्हा परिषदेचे शाळेत झाले तर माध्यमिक आणि उच्चशिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या पुणे येथे गेल्या. येथे असताना कुटुंबावर आर्थिक भार नको म्हणून त्यांनी 2017 पासून खाजगी शिकवणीतून आपला खर्च भागवला. तसेच स्वतः कोणतेही खाजगी क्लासेस न लावता फक्त स्वअध्ययनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांची तयारी केली.
सहा वर्षांपासून विविध स्पर्धा परीक्षा देत असताना यशाने हुलकावणी दिली. मात्र, हिंमत न हारता अभ्यासातील सातत्याने अखेर रोहिणी यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. 'शाळा निरीक्षक प्रमाणित आणि संस्था' या राजपत्रित अधिकारी वर्ग 2 पदी त्यांची निवड झाली आहे. अपयश येत असतानाही अभ्यासात सातत्य ठेवत रोहिणी यांनी मिळवलेले यश नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
सातत्य असेल तर यश मिळतेच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना निराश न होता सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. प्लॅन-बी सुद्धा तयार असला पाहिजे.अभ्यासात सातत्य ठेवले तर यश मिळतेच. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी छोटे मोठे काम केले तरी हरकत नाही.- रोहिणी सोळुंके