लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतकरी आत्महत्या वाढण्यामागे आर्थिक हतबलता हे कारण आहे, परंतु यावर उपाय असून, तो थोडा संयमी उपाय म्हणजेच नैसर्गिक शेती हाच असल्याचा दावा झिरो बजेट शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी केला. ते रविवारी जालना दौऱ्यावर आले होते. त्यांनी जालना तालुक्यातील सामनगाव येथे शिवारफेरी करून, मोसंबी बागांची पाहणी केली.या वेळी पत्रकारांशी बोलताना पाळेकर म्हणाले की, स्वामी नाथन आयोगाने ज्या शिफारशी केल्या आहेत, त्या देणे सरकारला परवडत नाही, त्यातच ज्यावेळी शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येतो, त्यावेळी आयात-निर्यातीचे धोरण बदलते. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतील भाव गडगडतात आणि शेतकऱ्यांच्या श्रमाला कवडीमोल किंमत मिळते. तसेच रासायनिक आणि सेंद्रिय शेती करताना जो खर्च येतो, तो न परवडणारा असतो, आणि त्यातूनच मग शेतकºयांवर बँकांचे कर्ज वाढते. ते न फेडता आल्याने शेतकरी हतबल होऊन जीवन संपवतो. त्यामुळे सरकारने कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करावी, परंतु, ही कर्जमुक्ती सरकारच्या भरवशावर शक्य होणार नसून, त्यासाठी नैसर्गिक शेती हाच एक सक्षम पर्याय असल्याचे ते म्हणाले. पाळेकर यांनी सारवाडी येथील बनवारी यांच्या शेतीलाही भेट देऊन पाहणी केल्याचे सांगितले.नैसर्गिक शेतीत अत्यल्प खर्च येत असून, ती पर्यावरणपूरक आहे. भारतात जवळपास सात लाख शेतकरी हे आता नैसर्गिक शेतीकडे वळल्याची माहिती पाळेकर यांनी दिली. या शेतीला पाणी आणि वीजही कमी लागत असून, रासायनिक निविष्ठांचा येथे प्रश्नच येत नाही, या शेतीतून जे उत्पादन निघते, ते देखील कसदार असते. या शेती उत्पादनला आजच्या बाजारपेठेत चक्क दीडपट भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी या शेतीकडे वळल्याचे ते म्हणाले. त्यांनी रविवारी सामनगाव येथील पूर्णत: नैसर्गिक शेतीच्या निकषनुसार मोसंबीची बाग दुष्काळातही मोठ्या हिंमतीने जगवल्याचे त्यांनी कौतुक केले. या शिवारफेरीत त्यांच्या सोबत जवळपास ४०० शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी दीपक बनवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
नैसर्गिक शेती हाच शेतकरी आत्महत्यांवरील रामबाण उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 12:49 AM