तळणी (जालना ) : नापिकीला कंटाळून आणि कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. मुरलीधर हिंमतराव पवार (४३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मंठा तालुक्यातील बेलोरा येथील मुरलीधर पवार यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे ७९ हजारांचे पीककर्ज होते. गेल्या वर्षी मुलीचे लग्न केल्याने बँकेचे कर्ज फेडता आले नाही. कर्जाची रक्कम वाढत गेली. यंदाही शेतातून उत्पन्न निघाले नाही. शासनाने कर्जमाफी दिली असली तरी पवार यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ते नैराश्यात होते. कर्ज कसे फेडणार याच चिंतेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी, दोन मुले व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
कर्जमाफीचा लाभ नाहीयाबाबत महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे शाखाधिकारी बुधवंत यांना विचारले असता, मुरलीधर पवार यांच्याकडे ७९ हजारांचे पीककर्ज आहे. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे बुधवंत यांनी सांगितले.