लोकमत न्यूज नेटवर्करांजणी : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील उपकेंद्रातील यंत्र सामग्रीत तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणाने मागील बारा दिवसांपासून शेतीला पुरवठा होत नसल्याने संतप्त शेतक-यांनी अभियंता एस. के. म्हस्के यांना घेराव घालत वीजप्रश्न सोडवण्याची मागणी लावून धरलीउपकेंद्रातील फिडरचे रिले तुटले असल्याने व अॅक्सिलेटर फुटल्याने मागील बारा दिवसापांसून शेतीचा वीजपुरवठा बंद आहे. या बाबत वीज वितरण कंपनीने एजन्सीला कळवले असल्याचे म्हस्के म्हणाले. मात्र कळवूनही त्याचा उपयोग झाला नाही. या संदर्भात आ. टोपे यांनाही माहिती दिली. त्यांनी लगेचच वीज वितरण कंपनीतील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क करून तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरी देखील स्थिती जैसे थे होती. त्यामुळे चिडून जाऊन सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी गौतम देशमुख, श्रीकांत देशमुख यांनी सकाळी अकरा वाजता कार्यालय गाठून अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी ग्रामस्थांनी एकत्रित येत अभियंता म्हस्के यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी रांजणीसह परिसरातील आठ गावांतील शेतकरी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने रहीम शेख, अमोल देशमुख, भगवान इंगळे, कुंडलीक जाधव आदींचा समावेश होता.यावेळी गौतम देशमुख, श्रीकांत देशमुख, रहीम शेख यांनी जर ही दुरूस्ती तातडीने केली नाही, तर आणखी आंदोलनाचा इशारा दिला.
रांजणी वीज कार्यालयात शेतकऱ्यांच्या संतापाचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 1:21 AM