जालना : तालुक्यातील अतंरवाला सिंदखेड येथील शेतकरी दत्तु यशवंतराव कळकुंबे (५४) यांनी आज दोन वाजेच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनामध्ये विषारी द्रव्य प्राशन केले.
या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती. अत्यवस्थ झालेल्या या शेतकऱ्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात एक तासानंतरही विषारी द्रव्याचा उग्र वास येत होता. तसेच विषाची बाटली आणि सांडलेले द्रव पडून होते. गट एकत्रीकरणाच्या कारणावरुन विषारी द्रव्य प्राशन केल्याचे दत्तु कलकुंबे यांनी सांगितले. गेल्या वर्षापासून न्याय मिळावा या मागणीसाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत होतो, असे त्यांनी सांगितले.