जालना : तालुक्तील हिस्वन (खु.) येथे वीज पुरवठा सुरू करण्यासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान एका शेतक-याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान घडली.हिस्वनसह परिसरातील १० ते १५ गावांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने थकबाकीवरून बंद केला. यामुळे परिसरातील ५०० ते ७०० ग्रामस्थांनी मंगळवारी सायंकाळी हिस्वन (खु.) येथील विद्युत उपकेंद्रावर आंदोलन केले. यावेळी वीज वितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान हिस्वन (खु.) येथील हनुमान गव्हाणे (५२) हृदयविकाराचा झटका आल्याने खाली कोसळले. तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती वीज वितरण कंपनीने अधीक्षक अभियंता अशोक हुमणे यांना मिळाल्यावर त्यांनी तातडीने या केंद्राचा वीज पुरवठा पूर्ववत केला. १० ते १२ गावातील ग्रामस्थांकडे जवळपास एक ते सव्वा कोटी रूपयांची थकबाकी असल्याच्या कारणावरून हा वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले. वीज पुरवठा खंडीत करण्याच्या मोहिमेचाच हे शेतकरी बळी ठरल्याची संतप्त प्रतिक्रीया शेतकºयांतून व्यक्त करण्यात आली. यावेळी सरपंच अंबादास आटोळे यांच्यासह अन्य शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:51 AM