- फकिरा देशमुखभोकरदन ( जालना ) : शिक्षणासारखे दुसरे अमृत नाही, देशातील गरीबी दुर करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. खुद्द भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितले आहे की, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. माझ्या यशामागील गमक ही शिक्षणच आहे, अशा भावना पद्मश्री हिंमतराव बावस्कर यांनी आज व्यक्त केल्या. ते देहेड या त्यांच्या मुळगावी झालेल्या सत्काराला प्रत्युत्तर देताना बोलत होते.
भोकरदन तालुक्यातील देहेड या मुळगावी गावकऱ्यांच्यावतीने आज पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांचा सपत्नीक नागरी सत्कार करण्यात आला. सुरूवातीला लेझीमच्या तालावर बैलगाडीमधून डॉ. बावस्कर आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रमोदनी यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. पुढे बोलताना डॉ. बावस्कर म्हणाले, जिवाचे रान करणाऱ्या शेतकरी माय-बापाच्या उपस्थितीत माझ्या जन्मभूमीत झालेला सत्कार माझ्यासाठी जगातील सर्वोच्च मोठा पुरस्कार आहे. आईवडील आणि गावांनी माझ्यावर लहानपणी केलेल्या संस्काराच्या शिदोरीमुळेच मला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, अशी कृतज्ञता ही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी नेहमी सकारात्मक राहावे, काही शेतकरी आपल्या परिवाराचा विचार न आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात, हे फार चुकीचे आहे. येणारा प्रत्येक काळ जाणारा असतो मग ते दुःख असो की सुख यासाठी शेतकऱ्यांनी खंबीरपणे संघर्ष केला पाहीजे, असे आवाहनही डॉ. बावस्कर यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी उपविभागीय अधिकारी अतुल सोरमारे, दलीत मिञ भगवान वाघ, माजी कृषी उपसंचालक भगवंतराव बावस्कर, जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दौड, लोकजागरचे केशव जंजाळ, बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष नारायण लोखंडे, नवनाथ पुंडलिक सोनवणे, डॉ. जनार्दन जाधव, ज्ञानेश्वर बावस्कर , कृष्णा वाघ, रामराव पाटील, राजु बावस्कर, अंबादास बावस्कर, सरपंच भारती बावस्कर, उपसरपंच शशिकला जाधव, गजानन जाधव, रावसाहेब बावस्कर आदी मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.