लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात आर्द्रा नक्षत्राने ब-यापैकी हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून, शनिवारी पडलेल्या चांगल्या पावसानंतर बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. जालना जिल्ह्यात आठ लाख १३ हजार पाकिटांपैकी जवळपास चार लाख बीटी बियाणांची विक्री झाली आहे. कपाशीच्या तुलनेत सोयाबीन, मका आणि बाजरीचे बियाणे मात्र, अद्याप तसेच असल्याचे सांगण्यात आले.मृग नक्षत्र कोरडे गेल्यावर शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने हिरमुसलेला शेतकरी पुन्हा आनंदी झाला. दुष्काळाची दाहकता विरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. बियाणांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या जालना बाजारपेठेत गेल्या दोन दिवसात बियाणे खरेदीसाठी गर्दी झाली होती. रविवारीही बियाणांची दुकाने उघडी होती. यंदा कृषी विभागाने बीटी बियाणांची जवळपास आठ लाखांपेक्षा अधिक पाकिटे उपलब्ध करून दिले आहेत. दोन वर्षापूर्वी बोंड अळीच्या फटक्यामुळे शेतकरी कपाशीकडे वळणार नाहीत, अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली आहे. जालना जिल्ह्यात जवळपास ५ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी होणार असून, बहुतांश शेतक-यांनी आपले शेत पेरणीसाठी तयार ठेवले आहे. आता शेतातील काडीकचरा उचलून शेत स्वच्छ करण्यासाठी शेतकरी राबत आहे. त्यातच आज जरी हा पाऊस पडला असला तरी, तो पेरणीयोग्य नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जालना जिल्ह्यात बियाणे तसेच खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने आठ भरारी पथकांची स्थापना केली आहे. त्यात सात तालुक्यांसह एक जिल्हा भरारी पथक स्थापन केले आहे.दरम्यान, शेतक-यांनी कुठलेही बियाणे अथवा खते खरी करतांना संबंधित व्यापा-यांकडून पावती घ्यावी, जेणेकरून बियाणांची उगवण न झाल्यास अथवा खतांमध्ये काही भेसळ आढळून आल्यास कारवाई करता येईल.
शेतकऱ्यांचा कल कपाशीकडे कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:24 AM