टेंभुर्णी: शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणात मजुरांची कमतरता भासत आहे. मशागतीचे सर्व कामे एकाच वेळी निघत असल्याने रोजंदारी वाढवूनही वेळेवर मजूर मिळत नाही. अशावेळी कमी मजुरांत व कमी वेळेत पेरणी, फवारणी आदी शेतीची कामे व्हावी म्हणून ग्रामीण भागात अनेक शेतकरी नवनवीन जुगाड शोधून काढत आहे.
जाफराबाद तालुक्यातील तपोवन गोंधन येथील शेतकरी नंदू शिंदे यांनी औषध फवारणीचे असेच एक कमी खर्चिक जुगाड शोधून काढले आहे. यात दोन माणसे एकाच वेळी सहा पंपाचे काम करू शकतात. या अनोख्या जुगाडात एकाच वेळी सहा फवारे निघत असल्याने एक एकर सोयाबीनच्या फवारणीसाठी अवघे वीस मिनिटे लागत आहे. स्वतःच्या शेतात फवारणी झाल्यानंतर दुसऱ्यांच्या शेतातही रोजंदारीवर हे जुगाड वापरले जात असल्याने त्याचाही मोठा फायदा या शेतकऱ्याला होत आहे.
केवळ दोन हजारापर्यंत खर्च
फवारणीसाठी वेळेवर मजूर मिळत नसल्याने फवारणीचे काहीतरी जुगाड शोधावे म्हणून मनात विचार आला. आणि लगेच प्रत्यक्ष जुगाड बनवायला सुरुवात केली. साध्या पंपावर बनविलेल्या जुगाडात पाईप, बांगडी, नवजल आदी साहित्यांचा वापर केला गेला आहे. यासाठी केवळ दोन हजारापर्यंत खर्च आला आहे. मात्र अवघी दोन माणसे यामुळे सहा माणसांचं काम एकाच वेळी करतात. सोयाबीन प्रमाणेच कपाशी, मका आदीं पिकांसाठी आपण असे जुगाड बनवू शकतो. सध्या इतरांच्या शेताततही फवारणी साठी या जुगाडाला एकरी ५०० रू.प्रमाणे दर मिळत असल्याने स्वतःच्या फवारणीसह नवा रोजगारही मिळत आहे.- नंदू शिंदे, शेतकरी, तपोवन गोंधन.