लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथे नाफेडने आधीच उशिराने हमीभाव केंद्र सुरु केले. या केंद्रावर सोयाबीन, मूग, उडीद इ. धान्य विक्री आणणे अपेक्षित होते. मात्र नाफेडच्या विविध जाचक अटीमुळे नोंदणीकृत शेतकरी नाफेडच्या केंद्रावर फिरकत नसल्याने केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला.जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती आहे. यामुळे सोयाबीन, मूग, उडिदाच्या उत्पन्न घटले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. निघालेल्या धान्याची शासनाने हमीभावाने खरेदी करण्याची मागणी शेतक-यांनी केली होती. शासनाने शेतक-यांचा रोष बघता तातडीने शासनाने मुगाला ६ हजार ९७५ रुपये, सोयाबीन ३ हजार ९९९, आणि उडीद ५ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला होता, मात्र हमीभाव केंद्र वेळेत सुरु न केल्याने शेतक-यांना कमी दराने व्यापा-यांच्या घशात धान्य विकावे लागले. यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यामुळे दसरा, दिवाळी सण उत्साहात साजरा करता आला नाही. १० आॅक्टोबर पासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावासाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. यात सोयाबीनचे ४८९, मूग ५६२, उडीद १७५ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. मात्र तब्बल महिनाभरानंतर प्रत्यक्षात नाफेडने खरेदी सुरु केली आहे. मात्र १२ टक्के आर्द्रता, काडीकचरा आणि चाळणी करून शेतमालाची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकºयाची अडचण वाढली आहे. तसेच हेक्टरी १ क्विंटल ६० किलो धान्य खरेदी करण्यात येत असल्याने उर्वरित धान्य कोठे विकावे म्हणून शेतकरी हमीभाव केंद्राकडे फिरकतच नसल्याचे चित्र दिसून आले.तुरीच्या पैशासाठी चकरागतवर्षी अनेक शेतक-यांनी हमीभावाने येथील केंद्रावर तूर विकली आहे. मात्र अद्यापही तुरीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारत आहेत. यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रावर धान्य विकण्यास कानाडोळा करत आहेत.