भागवत हिरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाडा कमी पावसाचा प्रदेश आहे. त्यामुळे वारंवार दुष्काळ पडतो आहे. पण, आपण दम न खाता उभं राहिले पाहिजे. फक्त शेतीवरच उपजीविका भागणार नाही. शेतीला व्यवसायाचा जोड द्या. पशुसंवर्धनातून आर्थिक स्त्रोत निर्माण करा, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केले. महा पशुधन एक्स्पो-२०१९ ला शनिवारी थाटात प्रारंभ झाला. यावेळी बागडे बोलत होते.देशातील पहिल्या पशुधन प्रदर्शन जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना बागडे म्हणाले, संकट येतात जातात. अनेक दुष्काळ मी पाहिले आहेत. पण, आपण मेहनती माणसं आहोत. त्यामुळे खचून जाऊ नका. देवाने दोन हात, दहा बोटं दिली आहेत, हे बहिणाबाई सांगून गेल्या आहेत. ते ध्यानात ठेवा. जगण्यासाठी फक्त शेतीवरच विसंबून राहू नका. पशुधन शेतक-याच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने जोड व्यवसायाच्या नव्या संधी आपल्यापर्यंत आल्या आहेत. मराठवाड्यात दुग्ध व्यवसाय कमी आहेत. गार्इंचे संवर्धन करा. त्यातून दुग्ध व्यवसाय करा, असा सल्ला हरिभाऊ बागडे यांनी यावेळी शेतक-यांना दिला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जून खोतकर, जि.प.चे अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनो, फक्त शेतीवर उपजीविका भागणार नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 12:55 AM