अंबड तालुक्यात १३८ गावे आहेत. तालुक्यात ९७,२९३ हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्र असून, १७,४३३ हेक्टर ओलिताखाली आहे. तालुक्यात ऊस, कापूस व फळबागांचे क्षेत्र मोठे आहे. यंदा जोरदार पाऊस झाल्याने विहिरी व बोअरवेलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोेठ्या जोमाने रब्बी हंगामातील पिकांची लागवड केली होती. पिकेही जोमात आली होती. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, ज्या वेळी पिकांना पाण्याची गरज होती, त्यावेळीच महावितरणकडून वीजबिल न भरलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले. त्यानंतर, महावितरणने शेतकऱ्यांनी वीजबिल भरण्याचे आवाहन केले. वीजपुरवठा खंडित असल्याने पाण्याअभावी पिके सुकू लागली होती. त्यातच महावितरणने शेतकऱ्यांना ५० टक्के रक्कम भरण्याचे आवाहन केले. त्यानंतर, तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी वीजबिल भरले आहे. अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांकडे २६२.४४ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी आतापर्यंत एक कोटी ७२ लाख रुपयांची थकबाकी शेतकऱ्यांनी भरली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने वीजबिल भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी भरले एक कोटी ७२ लाख रुपयांचे वीजबिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:27 AM