विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गतवर्षी गुलाबी बोंडअळीचे झालेले आक्रमण आणि त्यात दुष्काळाची धग यामुळे कपाशी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. तरीही यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कपाशीलाच सर्वाधिक पसंती दिली आहे. जिल्ह्यात आजवर २ लाख २२ हजार ६४९ हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. यापाठोपाठ सोयाबीनची ८३ हजार २१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.मागील वर्षी दुष्काळ होता. त्यामुळे खरीप व रबी पिकांचा पालापाचोळा झाला होता. यामुळे यंदा वेळेवर पाऊस पडेल. अशी आशा शेतकऱ्यांना होती. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर २२ जूनला आद्रा नक्षत्राने शेतक-यांवर कृपा दाखवली आणि पावसाने जिल्ह््यातील काही तालुक्यांमध्ये हजेरी लावली. त्यानंतर शेतक-यांनी उसनवारीने बी-बियाणांची तजवीज करून पेरणी केली.जिल्हाभरात एकूण सरासरी ५९६७२२. ५० हेक्टर खरीप पेरणी क्षेत्र आहे. १० जून पर्यंत ४०३०८० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. म्हणजेच ६८.३० टक्के खरीप हंगामाचा पेरा पूर्ण झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वात जास्त पेरा कपाशीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात कापूस बागायत व जिरायत असे एकूण ३०२१६५ सरासरी हेक्टर क्षेत्र कपाशी लागवडी योग्य आहे. सद्यस्थितीत २२२६४९ हेक्टरवर कपाशीची लागवड जिल्हाभरात झाली आहे. यात जालना तालुक्यात ३०१५० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. भोकरदन तालुक्यात ३८०२२, जाफराबाद २०६३४, बदनापूर ६९२६०, अंबड १९१६२, घनसावंगी, १३०१२, परतूर ३३८३४ आणि मंठा तालुक्यात १८५७५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. उर्वरित कालावधीत इतर क्षेत्रावरही खरिपाचा पेरा होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
बळीराजाची कपाशीला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:31 AM