जिल्ह्यात आज घडीला जवहपास ९८० एकरवर एक हजारपेक्षा अधिक शेतकरी हे रेशीमची लागवड करतात. अत्यंत कमी पाण्यावर येणारे पीक सध्या कोरोना काळात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. जिल्ह्यात रेशीम शेतीची गती पाहता येथे रेशीम कोष निर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वी हे कोष विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते. परंतु मध्यंतरी तत्कालीन पालकमंत्री बबनराव लोणीकर तसेच बाजार समितीचे सभापती आणि तत्कालीन पशसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत जालन्यात पहिली.रेशीम कोष खरेदीची बाजारपेठ जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू केली.
तसेच रेशीम कोष खरेदीसाठी अद्यायावात गोदाम तसेच लिलावासाठी जागा अशी स्वतंत्र बाजारपेठेची इमारत बांधण्यासाठी सहा कोटी रूपये मंजूर झाले होते. त्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी दिली. सध्या कोरोना काळातही रेशीम कोषाला प्रतिकिलो सरासरी ४०० रूपयांचा दर मिळत आहे. जालना बाजारपेठेत दररोज एक ते तीन टन रेशीम कोषांची खरेदी होते. नंतर हेच कोष व्यापारी कर्नाटक, कोलकत्ता तसेच विदर्भातील घाऊक व्यापारी खरेदी करतात. जालन्यात बुधवारी या रेशीम कोषाला ३७५ रूपये किलोचे दर मिळाले आहेत.
चौकट
रेशीम शेतीत आणखी मोठी संधी
आज जिल्ह्यातील रेशीम शेतीने आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कमी पाण्यावर उत्पादनाची आणि चांगल्य दराची हमी मिळते. सरासरी एका एकरातून शेतकऱ्यास एक ते दीड लाख रूपयांचे उत्पन्न ह रेशीम कोष विक्रीतून मिळत असल्याने आणखी मोठी संधी रेशीम शेती वाढण्यास राहणार आहे.
अजय मोहिते, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना