जालना : प्रधानमंत्र्यांच्या सभेत भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री व्यासपीठावर असतात हे मोदींना कसे चालते असा सवाल उपस्थित करून विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मोदींना शेतकरीच घराचा रस्ता दाखवतील अशी जोरदार टीका केली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार यात्रेत घनसावंगी येथे बोलत होते.
ते म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात अच्छे दिनच्या नावाखाली महागाई वाढत गेली. २०१४ मध्ये ५५ लीटर असलेले पेट्रोल आज ८० रूपयांवर पोहोचले आहे. पंतप्रधान स्वत:ला चौकीदार म्हणवतात. असे असताना मेहुल चोक्सी आणि विजय मल्ल्या, निरव मोदी हे देश सोडून जातात कसे असा सवाल त्यांनी केला. यासोबतच सोलापूर येथे पंतप्रधान मोदी आले असताना भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख हे व्यासपीठावर होते. ते त्यांना कसे चालतात असा सवाल उपस्थित करून आगामी निवडणुकीत शेतकरी आणि जनता मोदींना घरचा रस्ता दाखवतील असेही ते म्हणाले. तसेच खा. रावसाहेब दानवे यांच्यावर टिका करताना त्यांनी शेतकऱ्यांबद्दल दानवेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
भुजबळांची शिवसेनेवर टीका यावेळी माजीमंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांच्या खास शैलीत नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेच्या भुमिकेवर टिका केली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते. याच वेळी स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची ही हिंमत झाली नसती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडीओ क्लिप सभेत वाजवून दाखविली. त्या कशा फसव्या आहेत हेही स्पष्ट केले. सभेत आ. राजेश टोपे यांनी सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसल्याची टिका केली.