टेंभुर्णी : एरवी पौष महिन्यात आंब्याला मोहर फुटतो. मात्र, यावर्षी हे चित्र अपवादानेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे जाफराबाद तालुक्यातील केशर आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी, नळविहिरा, गणेशपूर, देळेगव्हाण, पोखरी, निमखेडा, देऊळझरी या भागांत सुमारे १०० एकरावर केशर आंब्याची लागड झाली आहे. तर काही शेतक-यांनी गटशेतीच्या माध्यमातून आंबा लागवड केली आहे. केशर आंबा उत्पादनातून दरवर्षी शेतकरी चांगला नफा कमवतात. त्यामुळे शेतकरी आंब्याची वर्षभर विशेष काळजी घेतात. दरवर्षी पौष व माघात आंब्याला मोहर फुटतो. पौष महिन्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीत बहुतांश आंब्यांच्या झाडांना मोहर येतो. परंतु या वर्षी तुरळक ठिकाणीच हे पाहावयास मिळत आहे. आता पौष संपून गुरुवारपासून माघ महिना लागला आहे. तरीही परिसरात कुठेच आंबे मोहरलेले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. वातावरणातील बदलांमुळे आंबे उशिरा व पाहिजे त्या प्रमाणात बहरत नसल्याने परिसरातील आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.-------------आमरायाही नामशेषटेंभूर्णी परिसरातील आमराया आता नामशेष झाल्या आहेत. काही शेतांमध्ये जुनी गावरान आंब्याची झाडे आमरायांची साक्ष देतात. यावर्षी मात्र गावरान आंब्यांसह, कलमी आंब्यांनाही अद्याप बहर न लागल्याने आमरसाची हौस विकतच्या आंब्यांवर भागावी लागणार आहे.---------------नोव्हेंबर ते जानेवारी हा आंबे मोहर फुटण्याचा काळ असतो. मात्र, यंदा अद्यापही आंब्यांना मोहर आलेला नाही. आंबे उशिरा मोहरले तरी गळ अधिक होते. त्यामुळे उत्पादन घटते. माझ्याकडे आंब्याची साडेतीन हजार झाडे आहेत. यातून यंदा पंधरा लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. मात्र, यात यंदा निम्म्याने घट होण्याची शक्यता आहे.- संजय मोरे, केशर आंबा उत्पादक, नळविहिरा
केशर आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:02 AM