लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : सिंचन विहिरींचे रखडलेले अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर मंगळवार पासून बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरू केले असून, जि. प. च्या मुख्य कार्यकारी या उपोषकर्त्यांना भेट देत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा या उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.परतूर तालुयातील शेतक-यांना पंचायत समिती कडून सिंचन विहिरी देण्यात आल्या होत्या. या विहिरी शेतक-यांनी उधार व व्याजाने पैसे घेऊन खोदल्या आहेत, मात्र या विहिरीचे अनुदान आता रखडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच या विहिरीत पात्र, अपात्रचा घोळ घालण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व विहिरींना नियमाप्रमाणे मान्यता देऊन तात्काळ अनुदान काढण्यात यावेत. या बरोबरच शेतक-यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, शेतक-यांना तात्काळ पीक कर्ज द्यावे, बोंड अळीचे रखडलेले अनुदान द्यावे, रोहयो अंतर्गत मजुरांना कामे देण्यात यावी, रखडलेला पीक विमा अदा करावा, द्राक्षाच्या बागांचा विमा भरून घेण्यात यावा, शौचालयाची रखडलेले अनुदान तात्काळ देण्यात यावे, दुष्काळ बाबत उपाययोजना करावी, मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरीची कामे चालू करून बिले अदा करावीत, २०१७ अंतर्गत मिळालेल्या विहिरी सुरू कराव्यात इ. मागण्या या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत. या उपोषणकर्त्यांनी जोपर्यंत जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी येऊन आमचे प्रश्न जाणून घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. या उपोषणकर्त्यांना सभापती कपिल आकात यांनी भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. या उपोषण कर्त्यामध्ये जि. प. सदस्य शिवाजी सवने, सरपंच ओंकार काटे, विठ्ठल तौर, मनोज सोळंके, अनिरूध्द बरकुले, महादेव सोळंके, भाऊसाहेब अंभुरे, सुभाष गायकवाड, आशोक अंभुरे, श्रीराम अंभुरे, चत्रभुज लहाने, संतोष लहाने, दगडू आनंदे, भासाहेब जगताप, महेश जगताप, शेख बछीरभाई, ज्ञानोबा उबाळे आदी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 12:18 AM