भोकरदन (जालना), दि. १४ : प्लॉट विक्रीसाठी मृत व्यक्तीच्या नावाने बनावट नोटरी करून फसवणूक करणा-या वकील पिता-पुत्रांवर शनिवारी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एकास पोलिसांनी अटक केली असून, दुसरा फरार झाला आहे.
याबाबत बाबासाहेब पगारे (रा. नळनी) यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार, अॅड. राहुल शिंदे व त्याचे वडील अॅड. अशोक शिंदे (रा. भोकरदन) यांनी पगारे यांना वालसा डावरगाव व बेलोरा शिवारात दोन प्लॉट विक्री असून तुम्हाला प्लॉट खरेदी करायचे आहे काय, अशी विचारणा केली. १२ आॅक्टोबर २०१७ रोजी राहुल शिंदे यांनी राजू भागाजी कराळे यांचा ६४० चौरस फुटाचा ४० हजार रूपये किमतीचा व अंकुश बाजीराव कोल्हे (रा़ बेलोरा) यांचा ८७५ चौरस फुटाचा प्लॉट ३० हजार रूपयात मिळऊन देतो, असे सांगितले. तेव्हा पगारे यांनी २० हजार रूपये अगाऊ म्हणून राहुल शिंदे यांच्याकडे दिले. त्यानंतर प्लॉटबाबत खात्री करण्यासाठी १३ आॅक्टोबर रोजी वालसा डावरगाव व बेलोरा येथे गेले असता, नोटरीच्या आधारे ज्यांच्या नावाचा प्लॉट आहे त्या दोन्ही व्यक्ती मृत झाल्याचे गावक-यांनी सांगितले.
पगारे यांनी यावर ग्रामपंचायतमध्ये जाऊन खात्री केली असता, ग्रामपंचायत कार्यालयाने त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र देत प्लॉटचे मूळ मालक शेषराव सिरसाठ व माणिक मोरे निधन झाले असल्याचे सांगितले. सगळा प्रकार लक्षात येताच पगारे यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात जाऊन अॅड. राहुल शिंदे व अॅड. अशोक शिंंदे यांच्या विरूध्द खोटे दस्तएैवज तयार करून, बनावट सह्या करून फसवणूक केल्याची तक्रार दिली. पोलिसानी अॅड. राहुल शिदे यांना अटक करून १४ आॅक्टोबरला न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. अॅड. अशोक शिंदे हे फरार आहेत़ पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तपास करत आहेत.