जालना : मृदा व जलसंधारण विभागाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील दीडशे तलावांमधील गाळ काढण्यात येणार आहे. यात भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक ४५, तर त्याखालोखाल जाफराबाद तालुक्यातील २२ तलावांचा समावेश आहे. तलावांमधील पाणी कमी झाल्यानंतर गाळ काढण्याच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे.शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागांतर्गत मागील वर्षांपासून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. पाझर तलाव, लघु तलाव गाळमुक्त होऊन त्यातील पाणीसाठवण क्षमता वाढावी, तसेच धरणांमधील सुपीक गाळ शेतक-यांना शेतीसाठी उपयोगी पडावा, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. गत वर्षी जाफराबाद तालुक्यातील शिंदी गावातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाला सुरुवात झाली होती. वर्ष २०१७-१८ साठी अभियानांतर्गत १५० गावांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भोकरदन तालुक्यातील सर्वाधिक ४५, जाफराबादमधील २२ तर घनसावंगी तालुक्यातील सर्वात कमी नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या तलावांमध्ये पाणी आहे. उन्हाळ्यात पाणी आटण्यास सुरुवात झाल्यानंतर मार्च ते मे या तीन महिन्यात सुमारे १. ५० लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन जलसंधारण विभागाने केले आहे. लोकसहभाग मिळाल्यास यात वाढ करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.----------मागील वर्षी ९८ तलावात कामलघु सिंचन जलसंधारण, लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून मागील वर्षी या अभियानांतर्गत १६० तलावांमधील गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, वेळेवर मशीन उपलब्ध न होणे, तसेच अंमलबजावणीस झालेला उशीर यामुळे केवळ ९८ तलावांमधील ११.८० लाख घनमीटर गाळ काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.------------जलयुक्तला हवीय गतीराज्यशासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. वर्ष २०१७-१८ मध्ये या अभियानांतर्गत १४९ गावांची निवड करण्यात आलेली आहे. जूनपर्यंत मंजूर कामे पूर्ण करण्याचे नियोजन असले, तरी विविध विभागांमध्ये असणारा असमन्वय, रखडलेली ई-निविदा प्रक्रिया, खोलीकरणाच्या कामांसाठी उपलब्ध न होण्याची मशीन यामुळे जलयुक्तची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हार प्रशासनासमोर आहे.------------गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार या अभियानांतर्गत मागील वर्षी लोकसहभागातून चांगली कामे झाली. यंदाही पाणी कमी झाल्यानंतर १५० तलावांमधील गाळ काढण्यास सुरुवात करण्यात येईल. काढलेला सुपीक गाळ शेतक-यांना मोफत देण्यात येणार आहे.- एस.डी. डोणगावकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, जालना.