जालना : कोरोना संसर्गामुळे रखडलेल्या १८० पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊ घातल्या आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, पोलीस मुख्यालयासह विविध घटकांतील पाच वर्षांचा कार्यकाळ संपलेल्या कर्मचाऱ्यांच्या आता बदल्या होणार आहेत. महिनाअखेर या बदल्या होणार असल्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सांगितले.
चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळण्यासाठी कर्मचारी आपले वजन वापरतात. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेत आता ११ जणांची नव्याने भरती होणार आहे. या शाखेत पोस्टिंग मिळविण्यासाठी अनेकांचा खटाटोप असतो. यासाठी काही अधिकारीही ही जागा मिळवून देण्यासाठी कारणीभूत असतात; परंतु आता पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी यात स्वत: लक्ष घालून चांगली कामगिरी, वैयक्तिक सोर्स, काम करताना मिळालेले हायस्ट रिवॉर्ड असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच फर्स्ट चॉइस असलेल्या एलसीबीत पोस्टिंग मिळणार आहे.
पाच वर्षांचा काळ पूर्ण केलेल्या पोलिसांच्या प्रत्येक वर्षी नियमित बदल्या केल्या जातात. काही पोलिसांच्या बदल्या विनंतीवरून केल्या जातात. या बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षकांवर असते. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता करण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामात सातत्य ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबविण्याचे आदेश राज्य शासनाकडून होते. कोरोनोचा संसर्ग वाढू नये, यासाठी सातत्याने लॉकडाऊन लावण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून इतर विभागांप्रमाणे पोलीस विभागही २४ तास रस्त्यावर होता. प्रत्येक वर्षी साधारण मेअखेरपर्यंत राज्यातील पोलीस विभागाच्या सर्वसाधारण बदल्या केल्या जातात. त्यानंतर, पोलीस घटकांतर्गत बदल्या केल्या जातात. त्यात सुरुवातीला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. पोलीस खात्यात होणाऱ्या बदल्यांची नेहमीच चर्चा असते. कोणता अधिकारी कुठे गेला, याची उत्सुकता सर्वांना असते, तसेच अनेक अधिकारी हव्या त्या ठिकाणी बदली मिळावी, म्हणून त्यांचे वजनदेखील वापरत असतात.
बदल्यांसाठीचे अर्ज मागविण्यात आलेले आहेत. त्यावर विचारविनिमयही सुरू आहे. चांगले काम करणाऱ्यांना तसेच रिवॉर्ड, गुन्हे तपासात प्रावीण्य असणाऱ्यांना चांगल्या ठिकाणीच संधी मिळणार आहे. महिनाअखेर बदल्या होतील.
-विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक, जालना
शाखा बदलीस पात्र कर्मचारी
स्थानिक गुन्हे शाखा ११
पोलीस ठाणे ६७
पोलीस मुख्यालय ५७
विविध शाखा ४५