लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने पुन्हा आपले वर्चस्व दाखविले आहे. अध्यक्षपदी उत्तम वानखेडे तर उपाध्यक्षपदी महेंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्ष व उपाध्यक्षानंतर आता सर्वांचे लक्ष सभापतींच्या निवडणुकीकडे लागले आहे. भाजपने अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत माघार घेतली असली तरी सभापती निवडीत भाजपचे दोन सभापती राहणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यात कोण बाजी मारणार, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.गेल्या पंधरा दिवसांपासून जालना जिल्हा परिषदेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून होते.भाजपने पाच सदस्य फोडल्याने या निवडणुकीत रंगत आली होती. परंतु, ऐनवेळी भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्याने महाविकास आघाडीने जि.प.वर आपले वर्चस्व कायम राखले.अध्यक्षपदी उत्तम वानखेडे तर उपाध्यक्षपदी महेंद्र पवार यांची निवड झाली. अत्यंत अटीतटीची होणारी ही निवडणूक बिनविरोध झाली.असे असले तरी भाजपने दोन सभापती देण्याच्या अटीवरच अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत माघार घेतली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जे सदस्य सभापतीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरणार असल्याचे चित्र आहे.विद्यमान सभापती म्हणून सेनेच्या घुगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रघुनाथ तौर, काँग्रेसचे बनसोडे तर बांधकाम सभापती म्हणून सतीश टोपे होते. यावेळेस भाजपला दोन सभापतीपद दिले तर महाविकास आघाडीला एक सभापतीपदावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.महाविकास आघाडीकडून सभापतीपदासाठी अनेक जण इच्छुक आहे.यात राष्ट्रवादीचे जयमंगल जाधव, राम सावंत यांच्या पत्नी, काँग्रेसचे सईदाबी अब्दुल परसुवाले, शिवसेनेच्या अयोध्या जयप्रकाश चव्हाण, यादवराव राऊत, बाबासाहेब गोल्डे यांची नावे चर्चेत आहेत.जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेच्या तारखेनंतर १५ दिवसाच्या आत विषय समित्यांचे सभापती निवडण्यासाठी सभा आयोजित करणे आवश्यक आहे. त्यानुसार २० जानेवारीला पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सभापतीपदासाठी सदस्यांची ‘फिल्डींग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 1:16 AM