लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील व्यापारी विमलराज सिंघवी यांच्यावर गावठी पिस्तुलाने झालेल्या हल्ला प्रकरणात पाचव्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने पांढरकवडा परिसरात कारवाई करून ताब्यात घेतले. या प्रकरणातील पाचही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.जालना येथील व्यापारी विमलराज सिंघवी यांच्यावर ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी गावठी पिस्तुलाने गोळीबार झाला होता. या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाधिकारी स्थागुशाचे पोनि राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या टीमने सोमीनाथ उर्फ पप्पू रामभाऊ गायकवाड (रा. करोडी ता. जि. औरंगाबाद ह.मु. शिवनगर, जालना), दत्ता बाबासाहेब जाधव (रा. अंबा ता.परतूर), जालिंदर सर्जेराव सोलाट (रा. मांडवा ता. बदनापूर) यांच्यासह या प्रकरणाची सुपारी देणाºया राजेश मानकचंद नहार (रा. परतूर) यालाही ताब्यात घेतले होते. तसेच गावठी पिस्तूल, जीप, कार असा जवळपास ८ लाख ३० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.या प्रकरणात रोहित गुणवंत देशमुख (पांढरकवडा, जि. यवतमाळ) याचे नाव समोर आले होते. स्थानिक गुन्हे शाखेने २६ नोव्हेंबर रोजी कारवाई करून रोहित देशमुख याला ताब्यात घेतले. कारमधून आलेल्या तिघांसमवेत देशमुख याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पाचही आरोपींची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील पुढील तपासाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.सुपारी घेतल्यानंतर गायकवाड व त्याच्या सहकाऱ्यांनी सिंघवी यांच्यावर दहा ते पंधरा दिवस पाळत ठेवली होती. त्यांच्या हलचाली टिपल्यानंतर मॉर्निंग वॉकची वेळ निश्चित करून ३१ आॅक्टोबर रोजी सकाळी ठरल्यानुसार सिंघवी यांच्यावर आरोपींनी गोळीबार केला होता. मात्र, सुदैवाने मारलेली गोळी सिंघवी यांच्या चेहºयाच्या जबड्यावर लागल्याने आरपार गेली नाही आणि सुदैवाने त्यांचे प्राण बचावले.गावठी पिस्तूल प्रकरणांचा छडा लागण्याची गरजगावठी पिस्तुलाचा वापर करून गोळीबार केल्याच्या काही घटना चालू वर्षात घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी शेलगाव येथे युवकाची गोळी घालून अशीच हत्या करण्यात आली. त्या प्रकरणाच्या तपासातही अद्याप स्पष्टता दिसत नाही.गावठी पिस्तूल घेतले विकतसिंघवी यांची सुपारी घेतल्यानंतर संबंधित आरोपीने एकाकडून गावठी पिस्तूल विकत घेतले होते. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींनी वापरलेली पिस्तूल जप्त केले आहे. ही पिस्तूल ज्याच्याकडून विकत घेतले, त्याचाही शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.हवालातूनच हा हल्ला घडल्याची चर्चाजालना शहरातील अनेक मोठ मोठे उद्योग व्यवसायांमध्ये आजही हवालाने व्यवहार होतात. मध्यंतरी काही वर्षांपूर्वी जालना येथील कुरिअर कंपन्याही पोलिसांच्या रडारवर होत्या. अनेक कुरिअर कंपन्यांवर पोलिसांनी त्यावेळी छापे टाकले होते. विशेष म्हणजे, कुरिअर कंपनीमध्ये पैसे मोजण्याची बँकांप्रमाणे मशिन कशासाठी हवी, या मुद्द्यावरूनही पोलिसांनी त्यावेळी चौकशी केली होती. सिंघवी यांच्यावर झालेला हा हल्ला हवाला प्रकरणातून झाल्याची चर्चा आहे.लाखोंची ‘सुपारी’परतूर येथील राजेश नहार याने व्यापारी सिंघवी यांची लाखो रूपये देऊन सुपारी दिल्याची माहिती गायकवाड याने पोलिसांच्या चौकशीत दिली. गायकवाड याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, इतर आरोपींना जेरबंद करण्यात आले.
व्यापाऱ्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरणी पाचवा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 1:12 AM