वडीगोद्री ( जालना) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शहागड येथे मंगळवारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरू होते. महाकाळा, अंकुशनगर येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून उपोषणाला पाठिंबा दिला. शिवाय, एका तरूणाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून आरक्षणाची मागणी केली आहे.
मनोज जरांगे यांच्यासोबत अनेक मराठा बांधव, वयोवृद्ध, महिला या उपोषणाला बसले आहेत. यात मधुकर भीमराव मापारी, अर्जुन नामदेव काटकर, महेश मारोती खोजे, संभाजी पांडुरंग गव्हाणे, गंगुबाई दत्तात्रय तारख, विशाल दत्तात्रय झांजे हे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला.
आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना लिहिले रक्ताने पत्र
महाकाळा व अंकुशनगर येथील मराठा बांधवांनी बाजारपेठ बंद ठेवली. महाकाळा येथील भरत बापूराव आंबरुळे यांनी मराठा समजाला आरक्षण मिळावे म्हणून रक्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.