विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील अबाल-वृध्दांचे आकर्षण असलेल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील संगीत कारंजे कार्यान्वित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. संरक्षक भिंत, लॉनवरील आसन व्यवस्थेचे काम पालिकेमार्फत सुरू करण्यात आले असून, या भागात विविध प्रकारच्या गुलाबांची रोपे लावली जाणार आहेत. शिवाय सौंदर्यीकरणाच्या इतर कामामुळे हा परिसर आणखीनच निसर्गरम्य होणार आहे.जालना शहरातील आबाल-वृध्दांसाठी शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान हा आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. सकाळ व सायंकाळच्या सत्रात लहान मुले, महिलांसह युवक, आबाल-वृध्द या उद्यानात भटकंती साठी येतात. लहान मुलांसाठी येथे असलेली खेळणी ही आकर्षणाचा विषय आहे. विशेषत: रविवारसह इतर सुटीच्या काळात या उद्यानात मोठी गर्दी असते. काही खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी निधी मिळावा, म्हणून पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. तात्पुरत्या स्वरूपात झोका, घसरगुंडीसह इतर खेळण्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. या उद्यानात बसविण्यात आलेल्या संगीत कारंज्यांची टेस्टिंग झाली आहे. कारंजे परिसरातील संरक्षक भिंत, लॉनवरील आसनव्यवस्था, विविध गुलाबांच्या रोपणासह इतर सौंदर्यीकरणाची कामे केली जात आहेत. ती प्रगतीपथावर असून, लवकरच संगीत कारंजे शहरवासियांसाठी खुले होतील. लॉनवर केल्या जाणाऱ्या आसन व्यवस्थेवर बसून कारंजे पाहण्याचा आनंद शहरवासियांना घेता येईल.शहरातील संभाजी उद्यानाचे छत्रपती संभाजी उद्यान असे नामकरण करावे, अशी मागणी शहरातील विविध संघटनांनी नगर पालिकेकडे केली आहे. त्यानुसार नुकताच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नामोल्लेखाच्या ठरावाला सर्वपक्षीयांनी अनुमोदन दिले आहे.इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच या उद्यानाचा छत्रपती संभाजी महाराज उद्यान असा उल्लेख केला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
‘संभाजी’ उद्यानातील संगीत कारंजांचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:57 AM