जालना : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील मंदिरातून चोरी गेलेल्या मूर्तींचा शोध लावण्यात जालना पोलिसांना शुक्रवारी यश मिळाले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून पाच मूर्ती जप्त केल्या आहेत.
शेख राजू शेख हुसेन (रा. कर्नाटक, ह. मु. उस्मानाबाद), महादेव शिवराम चौधरी (रा. वैराग, ता. बार्शी, जि. सोलापूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. दि. २२ ऑगस्ट रोजी जांबसमर्थ येथील राममंदिरातून चोरट्यांनी पंचधातूच्या ११ मूर्तींची चोरी केली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून करीत होते. यासाठी सहा पथके स्थापन करण्यात आली होती.
पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून संशयित शेख राजू शेख हुसेन याला ताब्यात घेतले. त्याने सदरील गुन्हा हा एका साथीदारासह केल्याची कबुली दिली. शिवाय, चोरी गेलेल्या मूर्ती महादेव चौधरी याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाच मूर्ती पोलिसांनी केल्या जप्त पोलिसांनी शेख राजू शेख हुसेन याच्याकडून श्रीराम-सीता माता, भरत, शत्रुघ्न, हनुमानाच्या दोन अशा एकूण पाच रामपंचायतन मूर्ती जप्त केल्या आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे व अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी दिली. तिसरा मुख्य संशयित आरोपी शेख जिलानी हा फरार असून, त्याच्या मागावर पथक आहेत.
जांबसमर्थ येथील मंदिरात २२ ऑगस्ट रोजी चोरी झाली होती, पोलिसांनी चोरीचा छडा लावण्यासाठी सहा पथके स्थापन केली होती.