जालना : गत अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या जालना महानगर पालिका निर्मितीबाबतची अधिसूचना नगर विकास विभागाच्या उपसचिवांनी मंगळवारी जारी केली. यावर आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. ही अधिसूचना जारी होताच माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरातील विविध भागात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
उद्योगनगरी, बियाणांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या जालना नगरपालिकेचे महानगर पालिकेत रूपांतर व्हावे, यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह विविध संस्था, संघटनांच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. शासन आदेशानुसार यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनेही अहवाल सादर केला होता. समितीच्या अहवालानंतर अधीसूचना जारी करण्यासाठी सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त हरकती, सूचनांवर विचार केल्यानंतर जालना शहर महानगर पालिका म्हणून मंगळवारी ९ मे रोजी नगर विकास विभागाच्या उपसचिव विद्या हम्पय्या यांनी अधीसूचना जारी केली आहे.
याबाबत सूचना व हरकती दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, जालना महानगर पालिका घोषित होताच माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह समर्थकांनी शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून जल्लोष केला. शासनाच्या या निर्णयाला काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा मात्र पूर्वीपासूनच विरोध राहिला आहे. त्यांनी या निर्णयाबाबत गुरूवारी पत्रकार परिषद घेवून आपले मत मांडणार असल्याचे सांगितले.
शहराच्या विकासाला चालना मिळेल जालना महानगर पालिका व्हावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्या पाठपुराव्याला यश आले असून, आता शहराच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल.- अर्जुन खोतकर, माजी मंत्री