लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेड महसूल मंडलात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाही पंचनाम्याला सुरूवात न झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत ‘लोकमत’ने १२ सप्टेंबरच्या अंकात ‘जामखेड मंडलात पंचनाम्याची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महसूल प्रशासनाकडून पंचनाम्याला सुरूवात करण्यात आली आहे.
जामखेडसह भोकरवाडी, माळेवाडी, लेभेंवाडी, ठाकूरवाडी, बक्षेवाडी, नागेशवाडी, नारळवाडी, विठ्ठलवाडी, जोगेश्वरवाडी, पिंपरखेड, चिंचखेड, राहुवाडी, गंगाराम तांडा, शिरनेर, मठजळगाव, बोडखा आदी गावांमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी शेतात हजारो रुपये खर्च करून पेरणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, बाजरी, तूर ही पिके पावसाने जमीनदोस्त झाली आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून पिकांवर लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच यंदाही अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. २१ गावांमधील ११ हजार ५०० शेतकऱ्यांच्या दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही जामखेड मंडलात पंचनाम्याला सुरूवात करण्यात आली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, पंचनाम्याला सुरूवात करण्यात आली आहे.
सरसकट पंचनामे करण्याची मागणी
महसूल प्रशासनाकडून केवळ नदीकाठच्या शेतातील पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरसकट पंचनामे करण्याची मागणी पांडुरंग दळवी, परमेश्वर लेभे, भवानीसिंग चौहान, राम जाधव, तुकाराम धुळे, कृष्णा तार्डे, दीपक पांढरे, प्रदीप पवार, राहुल पागिरे, विजय जाधव, विजय पवार, नागेश वीर, रशीद मोमीन, सोहेल तांबोळी, कृष्णा नळकांडे, बळीराम पांढरे, दिनेश चौहान, सोमनाथ पवार आदींनी केली आहे.
फोटो ओळी
शेतात पाणी असतानाही तलाठी बाळासाहेब सानप, कृषी सहाय्यक अमोल गाडेकर, कोतवाल बाबासाहेब तुपे हे पंचनामे करत आहेत.