जालना : कंत्राट संपल्यानंतर कामावरून कमी करण्यात आलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गतच्या १०५ कर्मचाऱ्यांना शासनाने पुन्हा सेवेत रूजू करून घेतले आहे. त्यानुसार जवळपास ७० अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले असून, कोरोना रूग्णांची सेवाही त्यांनी सुरू केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी अशा एकूण १०५ जणांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती केली होती. कोरोनाच्या काळात या कंत्राटी कोरोना योद्ध्यांची सेवा करून अनेकांना कोरोनामुक्त केले. परंतुू, कंत्राट संपल्यानंतर केवळ मोबाईलवर एसएमएस करून त्यांना सेवा संपल्याचे सांगण्यात आले. अचानक नोकरी गेल्याने या १०५ जणांनावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागातील रिक्तपदांवर नियुक्ती मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. मागणीसाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. शिवाय राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन समस्या मांडण्यात आल्या. त्यावेळी पालकमंत्री टोपे यांनी प्रशासनाला अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनानेही कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अहवाल आणि म्हणणे असलेला अहवाल शासनाला दिला होता. कोरोना योद्ध्यांच्या लढ्याबाबत ‘लोकमत’ने वारंवार पाठपुरावा केला होता.
दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उभारलेला लढा पाहता शासनाने एक महिन्यासाठी त्यांना पुन्हा कर्तव्यावर रुजू करून घेतले आहे. कोरोनाची रूग्ण संख्या वाढत असताना जवळपास ७० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा कर्तव्यावर हजेरी लावली असून, कोरोना रूग्णांची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाची साथ अटोक्यात आल्यानंतर या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हा आरोग्य विभागातील रिक्तपदांवर योग्यतेनुसार किमान कंत्राटी स्वरूपावर तरी नोकरी द्यावी, असा सूरही या कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून निघत आहे.
रिक्तपदांवर नियुक्ती द्यावी
शासनाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या मुदतवाढीवर रुजू करून घेतले आहे. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर या कर्मचाऱ्यांना नियुक्तीवर ठेवले जाणार आहे. परंतु, कोरोनानंतर नोकरीचा प्रश्न निर्माण होणार आहे.
यामुळे जिल्ह्यातील रूग्णालयांमधील रिक्त पदांवर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती द्यावी, अशी मागणी हे कंत्राटी कर्मचारी करीत आहेत. शासनाने रिक्तपदे पाहता याचाही विचार करणे गरजेचे आहे.
पालकमंत्री राजेश टोपे होते सकारात्मक
कर्तव्यावरून कमी केल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेवून व्यथा मांडल्या. नोकरी गेल्यामुळे उपासमारीची वेळ आल्याचे सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेवून प्रशासनाला शासनाकडे अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या.