जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेडसह परिसरातील शेतकऱ्यांचे पीक नुकसान अनुदान बँकेत जमा करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत, जिल्हा बँकेने २,२०८ शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान अनुदान वर्ग केले आहे.
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जामखेडसह परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या नुकसानीचे प्रशासकीय पातळीवर पंचनामे करण्यात आले. त्यानंतर, शासनाने नुकसान अनुदान जाहीर केले, परंतु दिवाळीनंतरही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वर्ग केले जात नव्हते. याबाबत ‘लोकमत’ने दीड ‘महिन्यांनंतरही शेतकऱ्यांना मिळेना नुकसानभरपाई’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत, जिल्हा बँक प्रशासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले आहेत. जामखेड येथील मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण २,२०८ लाभार्थी शेतकरी सभासद आहेत. या सभासदांच्या नुकसान अनुदानापोटी एक कोटी ४२ लाख ७९ हजार ३४ रुपयांचा पहिला हप्ता खात्यात जमा झाला आहे, तर जवळपास सातशे सभासदांच्या नावामध्ये तफावत असल्यामुळे त्यांना किमान आठ दिवसांनंतर बँक खात्यातील पैसे मिळणार आहेत. सोमवारपासून या निधीचे वाटप केले जाणार आहे.
कोट
नुकसान अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पैसे काढण्यासाठी घाई न करता व कोरोनातील सूचनांचे उल्लंघन न करता आपापल्या वेळेत पैसे काढून घ्यावेत.
आर. बी. भुसारे
शाखा व्यवस्थापक, जिल्हा बँक