जाफराबाद : शासकीय भरडधान्य केंद्रांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या मक्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनीच भेट घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले आहे.
शेतकऱ्यांची देयके अदा करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून काही तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे उपोषणास बसलेले काही शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला गेले होते. जिल्हाधिकारी व पालकमंत्री राजेश टोपे यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी लवकरच मक्याचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. दरम्यान, जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांची शासनाच्या वतीने सहा महिन्यांपूर्वीच मका खरेदी करण्यात आली होती. शेवटच्या तीन ते चार दिवसांत खरेदी केलेल्या ८४ शेतकऱ्यांच्या २९४० क्विंटल मक्याचे ५१ लाख ७५ हजार रुपये अद्यापही मिळाले नाहीत. या सर्व शेतकऱ्यांच्या मक्याचे पैसे तत्काळ खात्यावर जमा करावे, अशी मागणी वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात आली. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेवटी शेतकऱ्यांनी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. यावेळी एकनाथ शेवत्रे, राजू बोराडे, शंकर सोळंकी, आत्माराम बकाल, भगवान चव्हाण, प्रभाकर गावंडे, सुभाष दळवी, सुभाष लोखंडे, दिलीप काळे, नामदेव काळे, अनिल काळे, विनोद बोरसे, प्रमिला डोळस, शेख खाजू शेख युसुफ, परसराम ढाळे, सखाराम गावंदे, विक्रम फदाट, शे. रियाज शे. गणी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पंडित, नितीन शिवणकर, सुभाष भोपळे, ज्ञानदेव शेवत्रे, गजानन सुळ, पांडुरंग चव्हाण, विनोद खेडेकर, वामन चव्हाण, बाळू इंगळे, अर्जुन कोरडे, संजय इंगळे, शोभाबाई दाभाडे, पंडित डुकरे आदींची उपस्थिती होती.