देऊळगाव राजा : खडकपूर्णा प्रकल्पातून कालव्यात पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने बुधवारी दुपारी कालव्याला पाणी सोडले आहे.
गतवर्षी जोरदार पाऊस झाल्याने देऊळगाव राजा येथील खडकपूर्णा प्रकल्प तुडुंब भरला. सध्या पिकांना पाणी देण्यासाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी खडकपूर्णा प्रकल्पातून कालव्याला पाणी सोडण्याची मागणी करीत होते. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. शेतकऱ्यांनी ही बाब खासदार प्रताप जाधव व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या कानावर टाकली. खासदार जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. तर, डॉ. खेडेकर यांनी निवेदन देऊन कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने पाणी सोडले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येणार आहे. याबद्दल माजी जि.प. सदस्य भगवान मुंढे, संभाजी शिंगणे, मधुकर शिंगणे, तुळशीराम पंडित, देवानंद ताठे, रामेश्वर वाकोडे, सुरेशभाऊ चेके, दीपक शिंगणे, गणेश मुजमुले यांच्यासह शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.