जालना : दिवाळीनिमित्त सुट्टी असल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील भोकरदन नाका परिसरातील बँक क्रेडिट एॅक्सिस ग्रामीण फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडून रोख ३ हजार रूपयासह ५० हजाराचे टॅब चोरून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. दरम्यान, सदर बाजार पोलिसांनी या प्रकरणी एका चोरट्यास जेरबंद केले आहे.
शहरातील भोकरदन नाका परिसरात एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर बँक क्रेडिट एॅक्सिस ग्रामीण फायनास कंपनीचे कार्यालय आहे. दिवाळीनिमित्त दोन दिवसांची सुट्टी असल्याची संधी साधून चोरट्यांनी या फायनान्स कंपनीच्या कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडून तिजोरी उघडून रोख रक्कम आणि टॅब चोरून नेले होते. रोख ३ हजार रुपयासह ५० हजाराचे टॅब, असा ५३ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर मॅनेजर मनोज तडवी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोनि संजय देशमुख यांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या २४ तासात या प्रकरणाचा पदार्फाश केला आहे. पोलिसांनी खबºयाकडून मिळालेल्या माहितीवरून किशोरसिंग रामसिंग टाक (२२, रा. गुरुगोविंदसिंगनगर) याच्या घरावर रात्री छापा मारून, त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने काही साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीतील १२०० रुपये व शिक्के जप्त केले आहेत. लांबविलेली तिजोरी त्याने भोकरदन रोडवरील राजूर चौफुली परिसरात फेकून दिल्याची कबुली दिली. पोलीस अन्य चोरट्यांचा शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रमेश रुपेकर, पोहेकाँ. रामप्रसाद रंगे, पोना. सुभाष पवार, पोकाँ. सुधीर वाघमारे, स्वप्नील साठेवाड, योगेश पठाडे, सोपान क्षीरसागर आदींनी केली.