बदनापूर : घोटण शिवारात विजेचा धक्का लागून एका शेतक-याचा मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाल्याप्रकरणी संबंधित कंपनीविरुध्द सोमवारी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यातील घोटण शिवारात काजळा-घोटण या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. पाच नोव्हेंबरला एका विद्युत पोलला ट्रकची धडक बसल्याने पाच विजेचे खांब पडले होते. १८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास गट क्रमांक १६२ मध्ये हे पोल उभारणीचे काम सुरू असताना, मुख्य तारेला अन्य तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे शेतात असलेल्या मनोहर भाऊसाहेब जगताप या शेतक-याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. तर दामोदर शेषराव जगताप, संभाजी जनार्दन जगताप व सचिन सखाराम जगताप (रा. घोटण) हे तीन शेतकरी जखमी झाले. या घटनेनंतर माजी आ. संतोष सांबरे व गावातील शेतक-यांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. सोमवारी सायंकाळी बबन श्रीमंतराव जगताप यांच्या फिर्यादीवरून आनंद कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी मृत्यूप्रकरणी आनंद कन्स्ट्रक्शनवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:08 PM