जालना : शाळेत गैरहजर का राहिला म्हणून जाब विचारून छडीने मारणा-या येथील राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका रिटा टंडन यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.या संदर्भात दहावीत शिकणारा विद्यार्थी धनंजय नरेश चौधरी याने नातेवाईकांसोबत येऊन ठाण्यात फिर्याद दिली. शुक्रवारी शाळेत गेल्यानंतर मुख्याध्यापिका रिटा टंडन यांनी प्रार्थना झाल्यावर माझ्यासह अन्य गैरहजर मुलांना बाजूला उभे केले. गैरहजर का होता याबाबत विचारले. मी आजारी असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी डॉक्टरांची चिठ्ठी आणली का, असे विचारले. माझ्या दोन्ही हातांवर छडीने मारले. त्यानंतर आॅफिसमध्ये बोलावून तीस मिनिटे उभे करून पुन्हा छडीने मारले. त्यामुळे माझ्या हातावर सूज आली, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार मुख्याध्यापिका रिटा टंडन यांच्यावर मुलांची काळजी व संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉन्स्टेबल विठ्ठल मेखले तपास करीत आहेत. दरम्यान, मुख्याध्यापिका टंडन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी नरेश चौधरी यांनी जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.---------------
छडीने मारले म्हणून मुख्याध्यापिकेवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:37 AM