जालना : तक्रारदार व त्यांच्या मुलाविरुध्द असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या जमादार मंडाळे यांच्या विरोधात लाच लुचपत विभागाने गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदारसह त्याच्या मुलाविरुध्द गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास जमादार मंडाळे यांच्याकडे आहे. सदर गुन्ह्यात अटक न करण्यासाठी, विनाकारण मारहाण न करण्यासाठी मंडाळे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदारांनी लाच लूचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी गुंडेवाडी ते गोंदी मार्गावर जावून पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. तडजोड करुन मंडाळे हे ४० हजार रुपये स्विकारण्यास तयार असल्याचे निषन्न झाले. त्यानंतर १० डिसेंबर रोजी सापळा लावला असता, मंडाळे यांनी लाचेची रक्कम स्विकारली नाही. याप्रकरणी सविस्तर अहवाल पोलीस अधीक्षकांकडे पाठविला असता, त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. गोंदी पोलीस ठाण्यात मंडाळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपअधिक्षक रवींद्र डी. निकाळजे, पोनि. आजिनाथ काशिद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, प्रदीप दौडे, संतोष धायडे, संजय उदगीकर, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रविण खंदारे यांनी केली.