राजूर (जालना ) : भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथील दिव्यांग वृध्द पित्याचा सांभाळ न करता ऊलट पित्याच्या जमीनीवर ताबा करून त्रास देणाऱ्या पुत्रा विरूध्द राजूर पोलिसांमध्ये शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या पुत्रात खळबळ ऊडाली आहे.
पळसखेडा पिंपळे येथील किसन हिरामन घोरपडे (७०) हे एका हाताने दिव्यांग आहेत. त्यांना पळसखेडा पिंपळे शिवारात गट क्रमांक १६७/१ व २ मध्ये जमीन आहे. गेल्या दोन तीन वर्षापासून त्यांचा मुलगा भाऊसाहेब किसन घोरपडे याने वडिलांना बेदखल करून सदर जमिनीवर ताबा घेत वहीती केली होती. तसेच या जमीनीवर स्वत:च्या कुटूंबाचा ऊदरनिर्वाह करीत होता. मात्र स्वत:चे वडील किसन घोरपडे यांचा अन्न, वस्त्र, निवारा, देखभाल, ऊपचार करणे हे त्याचे कर्तव्य असतांना तो दुर्लक्ष करीत होता. त्यामुळे दिव्यांग वडिलांचे हाल सुरू होते. त्रस्त झालेल्या किसन घोरपडे यांनी मुलाच्या जाचामुळे वैतागून टोकाची भुमिका घेवून आत्मदहनाचा निर्णय घेतला होता.
याबाबत हसनाबाद पोलीस ठाण्याचे सपोनि. एम. एन. शेळके यांनी वृध्द वडिलांचे होणारे हाल लक्षात घेवून याप्रकरणी सखोल अभ्यास करून मुलगा भाऊसाहेब घोरपडे याच्या विरूध्द राजूर पोलसांत शुक्रवारी रात्री भादवि. ४४७, ५०४, ५०६, ३४ सह कलम २४ आई-वडिलांचा व जेष्ठ निर्वाह व कल्याण अधिनियम सन २००७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा राजूरात दाखल झाल्याने आई वडिलांना न सांभाळणाऱ्यांमध्ये खळबळ ऊडाली आहे. पुढील तपास सहाययक फौजदार शंकर काटकर करीत आहे.