जालना : शहरातील अग्निशमनच्या जीर्ण इमारतीत वास्तव्य करणारे कर्मचारी मध्यरात्रीच्या सुमारासही अलर्ट राहत असल्याचे मंगळवारी रात्री केलेल्या पाहणीत समोर आले.
उद्योगनगरी असलेल्या जालना शहरासह परिसरात सतत आग, पूर, खदाणीत व्यक्ती बुडणे आदी घटना घडतात. अशा घटनांमध्ये जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाचे जवान काम करतात. परंतु, जालना येथील अग्निशमन दलाची इमारत जीर्ण झाली आहे. विशेषत: पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाचा अभाव आणि इतर असुविधा असतानाही या विभागातील कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत.
खुर्चीवर सहायक अधिकारी
जालना शहरातील अग्निशमन दलाच्या कार्यालयाला मंगळवारी रात्री भेट दिली असता सहायक अधिकारी सागर गडकरी हे कर्तव्य बजावत होते. तर विनायक चव्हाण, रशीद शेख व इतर कर्मचारी विविध कामे करण्यात व्यस्त होते. तर काहीजण आपत्तीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या बोटीच्या शेजारी आसरा घेऊन आराम करताना दिसून आले.
तयार स्थितीत पाच बंब
जालना येथील अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये मोठे पाच बंब आहेत.
हे सर्व बंब मंगळवारी रात्रीच्या सुमारास पाण्याने भरलेले होते. शिवाय आपत्तीसाठी लागणारे इतर साहित्यही सुस्थितीत आणि जाग्यावर दिसून आले.
परिसराची दुरवस्था
अग्निशमन दलाची इमारत जीर्ण झाली आहे. त्याच्या दुरूस्तीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
प्रमुख प्रवेशद्वारावरच चिखल झाल्याचे दिसून आले. तर परिसरात अस्वच्छताही पसरली आहे. या अस्वच्छतेतच या कर्मचाऱ्यांना काम करावे लागते.
नियम काय सांगतो?
अग्निशमन दलातील नियुक्त कर्मचारी आठ तासांच्या ड्युटीत कार्यालयात हजर असावेत.
त्यानुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक सहायक अधिकारी, दोन चालक आणि इतर सहा कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून आले.
शिफ्ट प्रमुख अधिकारी म्हणतात...
जालना शहरातील अग्निशमन दलातील अधिकारी, कर्मचारी २४ तास कर्तव्यावर असतात. रात्रीच्यावेळी केव्हाही कॉल आला तर तत्काळ घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणण्यासह इतर मदत केली जाते. इमारतीच्या दुरूस्तीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असून, तो लवकर मार्गी लागेल.
-संदीप दराडे, शिफ्टप्रमुख