लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील सावरकर चौकातील श्री नानक क्लॉथ स्टोअर्स या दुकानास रविवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत चेंजिंग रूमसह रेडीमेड कपडे जळाल्याने मोठे नुकसान झाले.सावरकर चौकात अर्जुनलाल सुगनलाल बुधानी मुख्य रस्त्यावर रदारीच्या ठिकाणी असलेल्या नानक कापड दुकानात ग्राहकांची कायम वर्दळ असते. दुपारी बाराच्या सुमारास बंद चेंजिंग रुममधून धूर येत असल्याचे येथील कामगारांनी पाहिले. चेंजिंग रुमचा दरवाजा उघडल्यानंतर आत ठेवलेल्या रेडिमेड कापड्यांच्या बॉक्सने पेट घेतल्याचे दिसून आले. चेंजिंग रुमच्या पाठीमागील बाजूस लागून असलेल्या मुख्य रस्त्यावरील दर्शनी काच आगीमुळे तापल्याने फुटली. त्यामुळे सर्वत्र काचेचे तुकडे विखुरले होते. दुकानातील ग्राहकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे डी.एम.जाधव बंबासह घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाचे अब्दुल बासेत, व्ही. के. बनसोडे, कमलसिंग राजपूत, आर.के.बनसोडे, सागर गडकरी, विठ्ठल कांबळे, अशोक वाघमारे, दत्ता मोरे, सुरेंद्र ठाकूर यांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. आगीच्या या घटनेमुळे बाजारात खरेदीसाठी येणा-यांची काही वेळ गैरसोय झाली. सुमारे दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे.
मुख्य बाजारपेठेतील कापड दुकानास आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 12:25 AM