लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील जुबेर शहा शब्बीर शहा यांच्या टेलरिंगच्या दुकानाला आग लागून यातील चार इलेक्ट्रिक शिलाई मशिन तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. या दुकानाशेजारी एक कपड्यांचे दुकान आहे. ते सुदैवाने वाचले. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.नेहमीप्रमाणे या दुकानातील कारागीर हे रात्री ११ वाजे पर्यंत दुकानात काम करत होते. दुकान बंद करून गेल्यावर एक वाजेच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली. या आगीत सर्व साहित्य तसेच नवीन कपडे जळून मोठे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत दुकान जळून मोठे नुकसान झाले. जुबेरखान हे एका पायाने अधू आहेत. असे असतानाही ते अन्य कारागिरांच्या मदतीतून टेलरिंगचा व्यवसाय करतात. ही आग लागल्याने त्यांच्या उपजीविकेचे साधन हरवले आहे. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे आली आहे.नवरदेवाचे कपडे जळालेयेथील लक्ष्मण बोरमळे यांच्या मुलाचे सोमवारी सायंकाळी लग्न होते. नवरदेवाचा लग्नाचा नवीन ड्रेस शिवण्यासाठी टाकला होता,तो ड्रेस शिवून तयार होता. मात्र अचानक आग लागल्याने तो ड्रेसही जळाल्याने नवरदेवाला नवीन ड्रेस घ्यावा लागला.
टेलरिंग दुकानाला आग; लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:23 AM