जालना, दि. 28 - जागेच्या वादातून झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी येथील संतोषी माता मंदिराजवळील बक्कलगुडा भागात घडली. जखमी तरुणाचे नाव आकाश ऋुषी टेकूर (२५) असून, त्याच्या डाव्या मांडीमध्ये गोळी लागली आहे. भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले, की बक्कलगुडा भागात राहणारे जगदीश गौड व टेकूर यांच्यात जमिनीचा जुना वाद आहे. शुक्रवारी दुपारी आकाश टेकूर काही व्यक्तींसह गौड यांच्या घराच्या मागील बाजूला असणा-या वादग्रस्त प्लॉटवर आला. या वेळी गौड यांचा मुलगा चेतन व आकाश यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. मुलाला मारहाण सुरू असल्याचे पाहताच जगदीश गौड परवाना असलेले रिव्हॉल्वर घेऊन बाहेर आले. त्यांनी आकाश टेकूरच्या दिशेने तीन राऊंड फायर केले. एक गोळी आकाश टेकूरच्या डाव्या मांडीत घुसल्याने तो खाली कोसळला. सोबत आलेल्यांनी त्याला तातडीने जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मारहाणीत चेतन गौडच्या डोक्याला मार लागला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जगदीश गौड यास रिव्हॉल्वरसह ताब्यात घेतले. पंचनामा करून पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे एकत्रित केले. या प्रकरणी सदर बाजार ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.