लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. दरम्यान, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पाच विद्यार्थ्यांना कॉपी करतांना भरारी पथकाने पकडले.परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने पुरेशा उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षक अथवा विद्यार्थी कोणालाही भ्रमणध्वनी संच नेण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. परीक्षेच्या काळातील गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्हास्तरावर नुकतीच बैठक घेऊन परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये यासाठी सूचना दिल्या होत्या. परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी सेंटरबाहेर सकाळी ९ वाजेपासूनच गर्दी केली होती. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापुर्वी विद्यार्थ्यांची बाहेर गेटवर तपासणी करुन वर्गात सोडण्यात आले.परंतु, तरीही पाच विद्यार्थ्यांना कॉपी करतांना भरारी पथकाने पकडले. भोकरदन तालुक्यातील सत्यशोधक विद्यालयातील दोन विद्यार्थी व मंठा तालुक्यातील दहफळ कंधारे ज्ञानदिप कनिष्ठ महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना रस्टिकेट करण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
पहिल्याच दिवशी पाच कॉपीबहाद्दरांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 12:50 AM