लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भाजपचे खा. रावसाहेब दानवे यांनी विकास करतांना तो केवळ स्वत:च्या परिवाराचा केला आहे. कुठलेही कंत्राट असले की, एक तर चुलत भाऊ अथवा जावई वा अन्य नातेवाईकांनाच दिली आहेत. त्यामुळे विकास करताना त्यांच्या नातेवाईकांचा आर्थिक विकास केला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार विलास औताडे यांनी शनिवारी येथे पक्षाच्या बैठकीत केला.यावेळी ते म्हणाले की, दानवे यांना हृदयाचा पत्ता नसून, त्यांची भूमिका शेतकरी विरोधी राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचा आपण पर्दाफाश करू, विकास म्हणजे केवळ रस्ते तयार करणे नव्हे, त्यातून गोरगरिबांसह शेतकऱ्यांचे समाधान होणे गरजेचे आहे. एकूणच औताडे यांनी त्यांच्या पहिल्याच जालना दौऱ्यात ही आक्रमक भूमिका दानवेंविरोधात घेतल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले होते. सतकर कॉम्प्लेक्स येथे ही बैठक सायंकाळी पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, डॉ. संजय लाखे पाटील, शहराध्यक्ष शेख महेमूद, कल्याण दळे, सुदामराव सदाशिवे, अॅड.विनायक चिटणीस, विजय कामड, बदर चाऊस, राजेंद्र राख, जीवन सले, महावीर ढक्का, विजय चौधरी, दिनकर घेवंदे, तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राम सावंत यांनी केले.आरोपात तथ्य नाहीआपण जालना लोकसभा मतदारसंघात कधी नव्हे एवढा निधी खेचून आणून रस्ते, पूल तसेच अन्य विकास कामांवर तो खर्च केला. या विकास कामांच्या गतीने विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळे ते माझ्यासह माझ्या कुटुंबियांवर बेछूट आरोप करत आहेत. या आरोपात कुठलेच तथ्य नाही.- खा. रावसाहेब दानवे,जालना
दानवेंविरोधात विलास औताडे पहिल्याच बैठकीत आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:25 AM