लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा येथील नदीपात्रातमच्छीमारीसाठी गेलेला संतोष दत्तराम हिरवे (४१) हा मच्छीमार वाहून गेला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उस्वद- कानडी शिवारात घडली. मात्र, कल्पना देऊनही घटनेच्या २३ तासानंतर मंगळवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास प्रशासकीय यंत्रणेने शोधकार्य सुरू केले.मंठा तालुक्यातील कानडी येथील संतोष हिरवे हा पूर्णा नदीपात्रात मच्छीमारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. उस्वद- कानडी शिवारातील पूर्णा नदीपात्रात पाणी आल्याने संतोष हिरवे हा सोमवारी दुपारी मच्छीमारीसाठी गेला होता. मात्र, तो वाहून गेला. घटनास्थळी उपस्थितांनी त्याचा शोध घेतला. त्याचा पत्ता लागला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन नदीपात्रात शोध घेतला. मात्र, त्यातही यश आले नाही.घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली होती. तहसीलदार सुमन मोरे, तलाठी नितीन चिंचोले यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच परतूर येथील अग्निशमन दलाचे पथक शोधकार्यासाठी बोलाविण्यात आले होते. मात्र, दुपारी ३ वाजेपर्यंत शोधकार्यासाठी पथकही दाखल झाले नव्हते. ४.३० वाजण्याच्या सुमारास पथक घटनास्थळी दाखल झाले असून, शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. हिरवे यांचे नातेवाईक व ग्रामस्थही शोध मोहीम राबवित आहेत.बुधवारी सकाळी पुन्हा सुरू होणार शोध मोहीमघटनेची माहिती मिळताच परतूर येथील अग्निशमन दलाचे पथक दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कानडी गावात दाखल झाले. मात्र, नदीपात्राजवळ जाण्यासाठी रस्ता चांगला नव्हता. त्यामुळे बोटीसह इतर साहित्य ग्रामस्थांच्या मदतीने घटनास्थळाकडे नेण्यात आले.सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शोध कार्य सुरू झाले. मात्र, केवळ दीड तास ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी पथक प्रमुख अनिल पारीख, रवी देशपांडे, अनिल कंनाके, विजय हेरकर, गजानन चव्हाण उपस्थित होते. बुधवारी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.मच्छीमारी करून उदरनिर्वाहसंतोष दत्तराव हिरवे हे कानडी गावचा जावई आहेत. मागील ३ वर्षांपासून पूर्णा नदीकाठावर कुडाचे घर तयार करुन ते कुटुंबासह राहत होते. अत्यंत हलाखीची परिस्थिती असून, मच्छीमारी करुन ते पत्नी, एक मुलगी, चार मुलांचा उदरनिर्वाह करीत होते.माहिती उशिरा मिळालीयाबाबत तहसीलदार सुमन मोरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, प्रशासनाला घटनेची माहिती उशिराने मिळाली. आम्ही परतूर येथील अग्निशमन दलाला तात्काळ माहिती दिली असून, त्यांनी शोध कार्य सुरू केले आहे.
पूर्णा नदीपात्रात मच्छीमार बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 1:11 AM