लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : मंठा तालुक्यातील कानडी येथील पूर्णा नदीपात्रात बुडालेल्या मच्छीमाराचा ३६ तासानंतर बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास मृतदेह तरंगत पाण्यावर आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही ते ८ तास उशिराने घटनास्थळी दाखल झाले.मंठा तालुक्यातील कानडी येथील संतोष दत्तराम हिरवे (४१) सोमवारी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास कानडी- उस्वद शिवारीतील पूर्णा नदीपात्रातमच्छीमारी करण्यासाठी गेल्यानंतर वाहून गेला होता. या घटनेच्या २३ तासानंतर परतूरच्या अग्निशमन दलाच्या पथकाने शोधकार्यास सुरूवात केली. मंगळवारी केवळ दीड तास शोधकार्य करण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळी शोध मोहीम राबविण्यात येणार होती.मात्र, बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास सोयाबीन काढणीसाठी जाणाºया महिलेला पूर्णा नदीपात्रात मच्छिमार संतोष हिरवे यांच्या मृतदेह तरंगताना आढळून आला. ग्रामस्थांनी तात्काळ तालुका प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने घटनास्थळीच शवविच्छेदन करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. पार्थिव पहाटे ६ वाजता आढळून आले. मात्र, सूचना देऊनही आठ तास उशिराने वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ठोकसळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. आर. पी. राठोड, दहिफळ खंदारे प्रामिक आरोग्य केंद्राचे डॉ. अमोल काकड, मंठा ग्रामीण रूग्णालयाचे अरूण राठोड यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, सायंकाळी मयताच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मच्छ व्यवसाय सहायक आयुक्त शशिकांत जाधव, मच्छीमार शिखर संघाचे सुभाष भारस्कर उपस्थित होते.
३६ तासांनंतर आढळला मच्छीमाराचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 12:54 AM