जालना : शहरातील विविध भागांत घरफोड्या करणाऱ्या पाच आरोपींना सदर बाजार पोलिसांनी गुरुवारी जेरबंद केले. पापालाल ज्वालासिंग कलाणी (वय २२), अरुणसिंग ज्वालासिंग कलाणी (१९, रा. शिकलकरी मोहल्ला), बऱ्हयामसिंग रामसिंग कलाणी (४९, रा. हिंदनगर जालना), शेख सगीर शेख मिया (४२, रा. मंगळबाजार), शेख फिरोज शेख अनवर (३५, रा. संजयनगर जालना) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ६ लाख ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख गणेश झलवार व त्यांच्या पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन रवाना केले होते. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. घरफोड्या या शिकलकरी मोहल्ल्यातील रेकॉर्डवरील आरोपींनी केल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रेकॉर्ड वरील आठ गुन्हेगारांनी हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. माहिती मिळताच, पोलिसांनी पापालाल कलाणी, अरुणसिंग कलाणी, बऱ्हयामसिंग कलाणी, शेखसगीर शेख मिया, शेख फिरोज शेख अनवर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यातील सात आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, गुन्हे शोध पथक प्रमुख गणेश झलवार, पोलीस अंमलदार रामप्रसाद रंगे, रामेश्वर जाधव, समाधान तेलंग्रे, दीपक घुगे, जगन्नाथ जाधव, धनाजी कावळे, सोमनाथ उबाळे, योगेश पठाडे, महिला सुमित्रा अंभोरे, चालक प्रदीप आव्हाड यांनी केली.