लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : एका कुटुंबियांना शस्त्राचा धाक दाखवून सहा दरोडेखोरांनी ८७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, दरोड्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा व हसनाबाद पोलिसांनी दरोडेखोरांचा आठ किलोमीटर फिल्मी स्टाईल पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले. तर एक जण फरार झाला.राजूर येथील टेंभूर्णी रस्त्यावरील जिन्नसराव पुंगळे यांच्या घराच्या बाहेरून दरोडेखोरांनी कड्या लावून घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुंगळे कुटुंबियांना जाग आल्याने दरोडखोरांनी पोबारा केला. नंतर त्यांनी आपला मोर्चा जालना रस्त्यावरील जगन्नाथ बोर्डे यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या पाठीमागच्या दरवाजाची कडी तोडून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. जगन्नाथ बोर्डे यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत घरातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ८७ हजारांचा ऐवज लंपास केला. दरोड्याची माहिती राजूर पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनाही कळविण्यात आले. पोलिसांची तातडीने चार पथके तयार करून दरोडेखोरांचा शोध सुरू केला. पिंंपळगाव थोटे शिवारात दोन दरोडेखोरांना हसनाबाद पोलिसांनी तर गणेशपूर (ता.जाफराबाद) शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दरोडेखोरांना ग्रामस्थांच्या मदतीने आठ किलोमीटर पाठलाग करून जेरबंद करून राजूर पोलीस चौकीत आणले. पाठशिवणीचा हा खेळ सुमारे तीन तास चालला. ठाकूर लुट्या भोसले (रा.हिरडपुरी ता.पैठण,) भैय्या रहेमान चव्हाण, ढेब्या रहेमान चव्हाण, कुणाल रहेमान चव्हाण (रा.खंडाळा ता.पैठण) राजा उर्फ कुंडलिक सखाराम काळे (रा.रामगव्हाण ता.अंबड) अशी ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. एक जण फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जगन्नाथ बोर्डे यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंंह गौर, सहायक निरीक्षक किरण बिडवे, टेंभूर्णी ठाण्याचे सीताराम मेहेत्रे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, गुलाब पठाण, जगदीश बावणे, शिवाजी फुके, प्रशांत लोखंडे, संतोष वाढेकर, सपोनि शेख आशेप, सागर देवकर, गणेश पायघन, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, समाधान तेलंग्रे, विष्णू कोरडे, रामेश्वर शिवनकर, प्रशांत लोखंडे, जगदीश बावणे, संतोष वाढेकर, शिवाजी फुके यांनी ही कारवाई केली.
पाच दरोडेखोरांना पाठलाग करून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:08 AM