जालना : चंदनझिरा परिसरातून रागाच्या भरात निघून गेलेल्या महिलेसह दोन मुलांना चंदनझिरा पोलिसांनी चार राज्यांत पाच दिवस फिरून १४०० किलोमीटर दूर असलेल्या मध्यप्रदेशातील बागपत जिल्ह्यातून शोधून आणले. पोलिसांच्या या कारवाईमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.
एक २७ वर्षीय विवाहित महिला ८ मे रोजी तिच्या दोन मुलांसह घरातून निघून गेल्याची तक्रार तिच्या आईने चंदनझिरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. शिवाय, महिलेचा पती शेख हसन याने आपल्या पत्नीचा घातपात झाल्याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी या प्रकरणी लक्ष घालून, पथक तयार करून महिलेच्या शोधासाठी पाठविले. सदरील महिला ही मुंबई येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथे जाऊन महिलेचे नातलग तसेच ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली. परंतु, येथे पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही. याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, सदरील महिलेच्या घराशेजारीच दिल्ली येथे एक जोडपे राहत होते. ते सहा महिन्यांपासून मुंबई सोडून दिल्ली येथे गेले असून, त्यांचा पत्ता व मोबाईल नंबर नसल्याचे समजले. तोच धागा पकडून पोलिसांनी हरियाणा, राजस्थानमार्गे दिल्ली गाठली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. या वेळीच सदरील महिला ही मध्यप्रदेशातील बागपत जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक लोकांना फोटो दाखवून महिला व मुलांचा शोध सुरू केला. शोधमोहिमेदरम्यान, सदरील महिला व दोन्ही मुले पोलिसांना मिळाली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, एएसआय कांबळे, पोलीस अंमलदार गोपाल दिलवाले, पोलीस अंमलदार अनिल काळे, श्रद्धा गायकवाड, आदींनी केली.
पतीच्या त्रासाला कंटाळून केले पलायन
पोलिसांनी सदरील महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्या महिलेेने सांगितले की, माझा पती मला नेहमी क्षुल्लक कारणावरून विनाकारण शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळे माझ्या मनात आत्महत्या करण्यासारखे विचार येत होते. परंतु, मी माझ्या दोन्ही मुलांसाठी माझ्या ओळखीच्या महिलेकडे राहण्यासाठी गेले होते.